E - समाज मंदिर व डिजिटल प्रशिक्षण


स्वातंत्रोत्तर काळात देशात अतिशय वेगाने शहरीकरण झाले. त्यात महाराष्ट्र राज्य सर्वात अग्रेसर राहिले. आज महाराष्ट्रात पंचेचाळीस टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शहरात राहते. यात मुंबई - पुणे व संलग्न महानगरातच महाराष्ट्रातील तीस टक्के जनता राहाते. परंतु हा विभाग महाराष्ट्राच्या जमिनीचा फक्त पाच टक्के मोडतो. शहरिकारणाचे अनेक फायदे आहेत तसे तोटे पण आहेत. शहराच्या लोकसंख्येत जशी बेसुमार वाढ होऊ लागते तसे त्याचे राहाणीमानावरील दुष्परिणाम दिसू लागतात. यातूनच ग्रामिणीकरणाची उलटी प्रक्रिया सुरू होते. आज महाराष्ट्र या परिस्थितीत येऊन पोहोचला आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण जनता अतिशय बुद्धिमान आणि कुशल आहे आणि राज्याच्या सर्वांगीण विकासात आजच्या पेक्षा अनेक पटीने जास्त योगदान करण्याची क्षमता या जनतेत आहे. परंतु हा बदल घडवून आणण्यासाठी ग्रामीण राहणीमानात आमूलाग्र बदल आणणे आवश्यक आहे. शहरात मिळणाऱ्या अद्यावत सुखसोई ग्रामीण भागातही उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

ग्राम विकास पद्धतशीर आणि वेगाने घडवून आणण्यास संघटित प्रशिक्षणाचे उपक्रम प्रथम हाती घेणे आवश्यक आहे. ग्राम विकासाचा आराखडा बनवण्यास आणि अंमलबजावणीसाठी लागणारे कौशल्य ग्रामस्थांत निर्माण होणे आवश्यक आहे. देशात या विषयातील अनेक तज्ञ आणि जाणकार आहेत. त्यांच्याशी ग्रामस्थांचा सुसंवाद घडवून आणणे आवश्यक आहे. या तज्ज्ञांना प्रत्येक गावात जाऊन मार्गदर्शन करणे सहज शक्य नाही तसेच ग्रामस्थांना शहरात सर्वच शिक्षण शिबिरांत भाग घेणे व्यावहारिक नाही. या समस्येचा तोडगा आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाने सोडवता येण्या सारखा आहे.

यातूनच 'E -समाज मंदिराची' ( E - Community Centre ) संकल्पना या ठिकाणी मांडली आहे. गावात डिजिटल उपकरणांनी सुसज्ज अशा E - समाज मंदिराची स्थापना करून डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बाहेर गावातील तज्ञांकडून प्रशिक्षण आणि सल्ला घेता येईल. क्लाउड मिटींग्स, प्रशिक्षण सत्र, चर्चा सत्र असे अनेक उपक्रम राबवता येतील. शिक्षण, आरोग्य, शेती, व्यवसाय अशा अनेक विषयांवर सत्र आयोजित करता येतील. आपापल्या आवडीप्रमाणे ग्रामस्थ अशा सत्रात भाग घेऊ शकतात. असे प्रशिक्षण एकत्रित बसून घ्यावे अशी संकल्पना E - समाज मंदिरात आहे. या मुळे विचार विनिमय होऊन सर्व समन्वयाने विकासाची दिशा साध्य होऊ शकेल.