संकल्पना
शिक्षण हाच समाजाच्या उन्नतीचा पाया आहे. शिक्षण ही वैयक्तिक तसेच सामाजिक आरोग्य आणि आर्थिक विकासाची गुरुकिल्ली आहे. शिक्षण केवळ सक्तीचे करून पुरेसे नाही, तर विद्यार्थ्यांत शिक्षणाची आवड निर्माण होणे आवश्यक आहे. आपल्या शाळेचा विद्यार्थ्यांना अभिमान वाटला पाहिजे. शाळेतील वातावरण प्रसन्न आणि शिक्षणाला पूरक असले पाहिजे. ग्रामीण भागात खास करून ही बाब महत्वाची आहे कारण पुष्कळ वेळा ग्रामीण भागात शिक्षणाबाबत काहीशी उदासीनता दिसून येते.
'माझी शाळा, सुंदर शाळा' या योजनेअंतर्गत आम्ही शाळेतील भौतिक सुखसोइंचा विकास करण्यावर भर देतो. जेणेकरून मुलांना शाळेबद्दल आपुलकी वाटावी आणि त्यांच्या शाळेतील हजेरीत नैसर्गिकरित्या वाढ व्हावी. मुलांना शाळेत जाण्याची उत्सुकता वाढावी आणि शाळेबद्दलचे त्यांचे प्रेम वाढावे. पंधरा वर्षीय अनय गावांदे व त्याची बहीण रेणुका यांनी स्थापलेली बुक या गिफ्ट सोबत हा कार्यक्रम राबवला.
पहिल्या टप्प्यात आम्ही शाळांना भौतिक सुखसोई देण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, इमारतींची डागडुजी, वर्गांमध्ये पुरेसा प्रकाश व खेळती हवा असावी, वर्गांमधून पुरेसे दिवे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था, सौचालये, सोलर वीज, खेळाचे साहित्य व मैदाने, शालेय पुस्तके, गणवेश, प्रयोग शाळा, वाचनालय, संगणक इत्यादी व्यवस्था शाळांना देऊ केल्या. शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त प्रशिक्षण, शिक्षकांचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा आणि खेळ यात भाग घेण्यास प्रोहोत्साहान इत्यादी उपक्रम राबवण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील काही होतकरू शाळा निवडण्यात आल्या. प्रत्येक शाळेच्या गरजेनुसार विकासाचा आराखडा तयार करण्यात आला व त्या प्रमाणे अंमलबजावणी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अमलबजावणी नंतर विद्यार्थ्यांच्या हजेरीत आणि शाळेतील सहभागात अमुलाग्र फरक दिसून आला. माध्यमिक परीक्षेच्या निकालात सुधारणा जाणवली आणि मुलांचा उच्च माध्यमिक शिक्षणाकडे कल वाढला.
गुळपोळी येथिल शाळेचे रंगकाम
सोलर वीजेची व्यवस्था
तुलसीनगर येथील प्राथमिक शाळा
देगांव येथील शाळेची बांधणी
विज्ञान प्रदर्शनात सहभाग
जवळगाव शाळेतील प्रयोग शाळा