शेती वा पिण्याच्या पाण्याची कमतरता हा सोलापूर जिल्ह्याला कायम भेडसावणारा प्रश्न आहे. जागोजागी बोरेवेल खणून जमिनीतल्या मर्यादित पाण्याच्या साठ्यातून पाणी खेचण्याची जणू स्पर्धाच या भागात चालू आहे. ५०० फुटापर्यंत खोल बोरेवेल खणली जातात. यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी तर कमी झालीच आहे परंतु पाण्याचा निकसही पुष्कळ प्रमाणात घसरला आहे. पिण्याच्या पाण्यातील क्षाराचे प्रमाण सर्वसाधारणपणें ८० ते १०० mg/l असावे लागते. ५०० mg/l पेक्षा जास्त क्षाराचे पाणी पिण्यास अयोग्य समजले जाते. क्षारयुक्त जड पाणी पचन क्रियेला बाधक असून, त्यापासून पोटाचे आजार, पौष्टिक घटकांची कमतरता, मूत्राशयाचे वा श्वसनाचे आजार इत्यादी संभवतात.
सोलापूर जिल्ह्यातील तीस शाळांमधील पिण्याच्या पाण्याची चाचणी प्रभाकर फाउंडेशन ने केली. जवळपास सर्व ठिकाणी क्षाराचे प्रमाण ५०० mg/l पेक्षा जास्त आढळले. किंबहुना सरासरी प्रमाण ९०० च्या वर होते. काही ठिकाणी तर क्षाराचे प्रमाण ३,००० mg/l आढळले!
पंधरा वर्षीय अनय गावांदे व त्याची बहीण रेणुका यांनी स्थापलेली बुक या गिफ्ट सोबत प्रभाकर फाउंडेशन ने २५ शाळांमधून RO पद्धतीवर आधारित जलशुद्धीकरणाची उपकरणे लावली. या सर्व ठिकाणी क्षाराचे प्रमाण ५०० mg/l पेक्षा जास्त होते. शाळेतील मुलांची व शिक्षकांची संख्या बघून उपकरणाची क्षमता ठरवण्यात आली. सर्व उपकरणे अद्यवत तंत्रज्ञानाने बनवली असून, वाळू, कार्बन, रिव्हर्स ऑसमॉसिस व UV तंत्रांचा उपयोग करण्यात आला आहे. पाण्यातील क्षाराचे प्रमाण १०० mg/l यावर जाणार नाही याची खबरदारी घेतली जाते. उपकरणाच्या खरेदीसोबत निर्मात्या कडून २ वर्षाची उपकरणांच्या कार्याची हमी ही घेण्यात आली. प्रकल्पांची उभारणी सहा महिन्यात करण्यात आली. १५ लाख रुपये खर्च करून पंचवीस शाळांतून ६,००० विद्यार्थ्यांना याचा फायदा करून देण्यात आला.